सोमवार, २३ मार्च, २०१५

पाकातल्या पुऱ्या

पाकातल्या पुर्‍या
 
साहित्य:

१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तेल, मोहनासाठी
चिमूटभर मिठ
दही (टीप)
पाक करण्यासाठी:- दिड कप साखर आणि १/२ ते पाऊण कप पाणी
१/२ टिस्पून वेलची पावडर
४ केशराच्या काड्या
तळण्यासाठी तूप (टीप)
 
 
कृती:

१) मैदा आणि बारीक रवा एकत्र करून १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चिमूटभर मिठ घालावे. दही घालून घट्ट मळून घ्यावे. १ तास तसेच झाकून ठेवावे.
२) साखर आणि पाणी एकत्र करून २ तारी पाक करावा. केशर थोडे गरम करून किंचीत साखरेबरोबर कुटून पाकात घालावे. वेलची पावडर घालून मिक्स करावे.
३) जेवढी मोठी पुरी हवी असेल त्यायोग्य पुरीसाठी समान आकाराच्या लाट्या बनवाव्यात.
४) तूप गरम करून पुर्‍या तळून घ्याव्यात. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात पुर्‍या टाकाव्यात. काही मिनीटे मुरू द्याव्यात. नंतर ताटात पाघळवत ठेवाव्यात.
सजावटीसाठी भरडसर वाटलेला पिस्ता पेरावा. या पुर्‍या पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.

टीप:
१) दही वापरताना आंबट दही घ्यावे. तसेच जर दही वापरायचे नसेल तर साध्या पाण्याने पिठ भिजवावे आणि पाकामध्ये लिंबाचा रस घालावा म्हणजे गरजेचा आंबटपणा पुर्‍यांना येतो.
२) तूपाऐवजी तेलात पुर्‍या तळल्या तरी चालतात. पण तुपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा