सोमवार, १३ एप्रिल, २०१५

कच्छी दाबेली

कच्छी दाबेली

साहित्य:

भाजीसाठी-  २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ टीस्पून पावभाजी मसाला, १ १/२ टीस्पून धणेपूड, ३/४ टीस्पून जिरेपूड ,१ टीस्पून लाल तिखट १ १/२, टीस्पून लसूण पेस्ट  १/४ टीस्पून, गरम मसाला,  मीठ चवीप्रमाणे,  २ ते ३ टेबलस्पून तेल.

वरून पेरण्यासाठी- मुठभर तिखट शेंगदाणे (घरी बनवण्यासाठी दाण्यांना थोडं तेल, मीठ आणि तिखट चोळून मग दाणे भाजून घ्या.)  १/२ कप डाळिंबाचे दाणे  ५-६ द्राक्षं तुकडे करून १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची तिखट चटणी  चिंचेची गोड चटणी  १ कप बारीक शेव  १/२ कप बारीक चिरलेला कांदा १०-१२ लादी पाव (पावभाजीचे पाव) पाव भाजण्यासाठी बटर

कृती:

१. बटाटे उकडून त्याची साले काढा. बटाटे गार झाल्यावर हाताने छान कुस्करून घ्या. कढईत तेल गरम करा आणि लसणीची पेस्ट घाला. खमंग वास आला कि लगेच कांदा घालून परता.

२. कांदा शिजला कि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. हळद, तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्या. नंतर कुस्करलेला बटाटा घालून परता. सगळ्या छान मिक्स करून घ्या. आता तुमची भाजी तयार झाली.

३. एका थाळीत किंवा पसरत भांड्यात हि भाजी घालून चपटी करून घ्या. त्यावर तिखट शेंगदाणे,डाळिंबाचे दाणे,चिरलेली द्राक्षे आणि कोथिंबीर घालून सजवा.माझ्याकडे डाळिंबाचे दाणे नव्हते म्हणून मी फक्त द्राक्ष वापरली होती. तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर नक्की वापरा त्यामुळे दाबेली जास्ती छान लागते

४. लादी पावाला सुरीने मधोमध चीर द्या. पाव पूर्ण उघडेल इतपतच चीर द्या. पूर्ण २ भाग होणार नाहीत याची काळजी घ्या. चमच्याने पावाला आतून पुदिन्याची तिखट चटणी लावा. नंतर चिंचेची गोड चटणी लावा.

चटण्या लावून झाल्या कि, चमचाभर भाजी घेऊन पावामध्ये पसरव. वरती थोडा कांदा,शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि १-२ द्राक्षाचे तुकडे घाला. सर्वात वर चमचाभर शेव घाला. पाव बंद करून तव्यावर दोन्ही बाजूनी भाऊन घ्या. पाव भाजताना पावाला वर खाली थोडेसे बटर लावा. गरम गरम दाबेली लगेच सर्व्ह कर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा